खळबळजनक! अमळनेरच्या २० वर्षीय तरुणीची नाशिकमध्ये चाकूने भोसकून हत्या

नाशिक : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील २० वर्षीय तरुणीची नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वनसंपदा सोसायटीसह संपूर्ण इंदिरानगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत तरुणीचे नाव वैष्णवी अनिल आवारे असे असून, ती मूळची अमळनेर येथील रहिवासी असल्याचे समजते. रथचक्र चौकापासून काही अंतरावर असलेल्या वनसंपदा सोसायटीतील दत्त मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने तरुणीवर चाकूने सपासप वार केले. हल्ल्यावेळी वैष्णवीने बचावासाठी जोरजोरात आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक मदतीसाठी बाहेर येईपर्यंत हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाला.

घटनेनंतर तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिचा जागीच मृत्यू झाला. वैष्णवी एका ठिकाणी पेइंग गेस्ट म्हणून राहत असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या मृतदेहाजवळ चाकू आढळून आला असून, पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोर तरुणीचा परिचित अथवा मित्र असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दोघांमध्ये शुक्रवारी सायंकाळी एका ठिकाणी चर्चा झाल्याचीही माहिती समोर आली आहे. वनसंपदा सोसायटीतील दत्त मंदिर परिसर रात्रीच्या वेळी तुलनेने शांत असतो. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत तरुणीवर अचानक हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त किशोर काळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे, सहायक निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्यासह इंदिरानगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चाकू ताब्यात घेतला. तसेच परिसरात नाकाबंदी करण्यात आली.

या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांकडून तपास सुरू असून, हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या निर्घृण हत्येने नाशिकसह अमळनेर परिसरातही खळबळ उडाली आहे.