पाचोर्यात गूढ गडगडाटी आवाजाने नागरिकांमध्ये संभ्रम; कारण अद्यापही अस्पष्ट

पाचोरा ( प्रतिनिधी )- पाचोरा शहर व परिसरात गुरुवारी (दि. १६) सायंकाळी सुमारे ४.३० वाजेच्या सुमारास अचानक गडगडाटासारखा मोठा आवाज ऐकू आल्याने नागरिकांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. शहरातील विविध भागांसह परिसरातील अनेक नागरिकांनी हा आवाज स्पष्टपणे ऐकला असल्याचे सांगितले आहे. मात्र, हा आवाज नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

घटनेनंतर शहरात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. काही नागरिकांनी हा आवाज स्फोटासारखा असल्याचे सांगितले, तर काहींनी तो आकाशातून किंवा अन्य नैसर्गिक अथवा तांत्रिक कारणामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला. तथापि, या सर्व चर्चांना कोणताही अधिकृत आधार मिळालेला नाही.

दरम्यान, संबंधित शासकीय यंत्रणा आणि प्रशासनाकडूनही या आवाजाच्या कारणाबाबत अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे हा गूढ आवाज नेमका कशामुळे झाला, याबाबतची उत्सुकता आणि संभ्रम कायम आहे.

प्रशासनाकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा अपुष्ट माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.