भुसावळ रेल्वे स्थानकावरील जुन्या एन-टाइप पादचारी उड्डाणपुलाचे चार स्पॅन हटविण्याचे काम १७ जुलैपासून

भुसावळ (प्रतिनिधी) -: मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत भुसावळ रेल्वे स्थानकाच्या खंडवा बाजूस असलेल्या जुन्या एन-टाइप पादचारी उड्डाणपुलाचे (Foot Over Bridge) चार स्पॅन रेल्वे क्रेनच्या सहाय्याने सुरक्षितपणे हटविण्याचे काम १७ जुलै २०२६ पासून हाती घेण्यात येणार आहे. हे काम रेल्वेच्या सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करून आणि नियोजित वाहतूक व्यवस्थेच्या अनुषंगाने टप्प्याटप्प्याने पार पाडले जाणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, स्पॅन हटविण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. स्पॅन क्रमांक १ (उत्तर बाजू प्रवेशद्वार व व्हीआयपी सायडिंग परिसर) १७ जुलै रोजी, स्पॅन क्रमांक २ (उत्तर बाजू प्रवेशद्वार व व्हीआयपी सायडिंग परिसर) १८ जुलै रोजी, स्पॅन क्रमांक ३ (प्लॅटफॉर्म क्रमांक ७ व प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ मधील मार्ग) १९ जुलै रोजी, तर स्पॅन क्रमांक ४ (प्लॅटफॉर्म क्रमांक ६ व प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ मधील मार्ग) २० जुलै रोजी हटविण्यात येणार आहे.

हे काम रेल्वे क्रेनच्या सहाय्याने करण्यात येणार असून, कामाच्या कालावधीत संबंधित परिसरात आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना करण्यात येतील. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत रेल्वे प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.

दरम्यान, प्रवाशांनी काम सुरू असलेल्या परिसरात अनावश्यक गर्दी करू नये, रेल्वे प्रशासनाने लावलेल्या सूचना फलकांचे पालन करावे तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे करण्यात आले आहे.