भुसावळ ( प्रतिनिधी )- भारत विकास परिषद, भुसावळ शाखेच्या नूतन कार्यकारिणीचा दायित्व ग्रहण समारंभ गुरुवार (दि. १६ जुलै २०२६) रोजी भुसावळ येथील स्व. सुशीलाबाई पालक विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास भारत विकास परिषद महाराष्ट्र उत्तर प्रांताचे अध्यक्ष विशाल चोरडिया, प्रांत पालक अरुणजी जोशी, प्रांत उपाध्यक्ष योगेश मांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात दीपाली हिंगवे यांनी सादर केलेल्या संपूर्ण वंदे मातरम्ने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते तुलसी पूजन, प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रांताध्यक्ष विशाल चोरडिया यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. प्रमुख वक्ते प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी आपल्या प्रबोधनात्मक भाषणात भारत विकास परिषदेच्या सामाजिक कार्याचा गौरव करत भावी पिढी सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संस्थेची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. प्रांत पालक अरुणजी जोशी यांनी भारत विकास परिषदेची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि विविध उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. मावळते अध्यक्ष सतीश खडायते यांनी मागील कार्यकाळातील उपक्रमांचा आढावा सादर करून सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले. मावळते सचिव हरीश कोल्हे यांनी मनोगत व्यक्त करत सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त केले, तर मावळते कोषाध्यक्ष गौरव हिंगवे यांनी आर्थिक अहवाल सादर केला. नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष – रमाकांत भालेराव, उपाध्यक्ष – रुपेश जैन व हरीश कोल्हे, सचिव – शंतनू गचके, कोषाध्यक्ष – कपिल मेहता. सेवा गतिविधी प्रमुख – संजय लाहोटी, संस्कार गतिविधी प्रमुख – सीमा बेंडाळे, महिला सहभागिता प्रमुख – जयश्री चौधरी, पर्यावरण गतिविधी प्रमुख – प्रदीप फिरके, संपर्क गतिविधी प्रमुख – विजय जोशी, तर संपर्क प्रमुख म्हणून आनंद फडके यांची निवड करण्यात आली. समारंभात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांसह विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधा चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन हरीश कोल्हे यांनी केले. सर्व सदस्यांच्या उत्स्फूर्त उपस्थिती व सहभागामुळे दायित्व ग्रहण समारंभ आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.


