भुसावळ–बडनेरा तिसरी व चौथी रेल्वेमार्ग प्रकल्प : अनधिकृत बांधकामांना मोबदला मिळणार नाही; रेल्वे प्रशासनाचा नागरिकांना इशारा ;

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ–बडनेरा तिसरी व चौथी रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असताना काही स्वार्थी व्यक्ती व दलाल नागरिकांची दिशाभूल करून रेल्वे हद्दीजवळ अनधिकृत बांधकामे करण्यास प्रवृत्त करत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. रेल्वेकडून मोठा मोबदला मिळेल, अशा खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवून काही ठिकाणी नव्याने बांधकामे केली जात असल्याने मध्य रेल्वे, भुसावळ विभागाने नागरिकांना अशा अफवा व भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

रेल्वे प्रशासनाने संपूर्ण प्रकल्प परिसराचे ड्रोन व व्हिडिओ सर्वेक्षण आधीच पूर्ण केले असून, मार्च ते जून २०२६ या कालावधीत बुलढाणा जिल्ह्यात रेल्वे हद्दीपासून ३० मीटरच्या आत रेल्वेची आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र (NOC) न घेता करण्यात आलेली तब्बल ११३ अनधिकृत बांधकामे आढळून आली आहेत.

यामध्ये जालंब–नांदुरा विभागात ४१, नांदुरा–बिस्वा ब्रिज विभागात ६२, तर बिस्वा ब्रिज–मलकापूर विभागात १० अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे.

रेल्वे बोर्डाचे पत्र क्र. 2015/LML-I/19/2 तसेच UDCPR मधील तरतुदींनुसार रेल्वे हद्दीपासून ३० मीटरच्या आत कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाचे NOC घेणे बंधनकारक आहे. सर्वेक्षणानंतर करण्यात आलेली कोणतीही नवीन अनधिकृत बांधकामे बेकायदेशीर मानली जातील. अशा बांधकामांना कोणत्याही प्रकारचा मोबदला किंवा नुकसानभरपाई दिली जाणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रेल्वे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, दलाल किंवा अन्य व्यक्तींच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवून आपल्या कष्टाच्या पैशांची गुंतवणूक अनधिकृत बांधकामांमध्ये करू नये. अशा बांधकामांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल आणि त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीस संबंधित व्यक्ती स्वतः जबाबदार राहतील.

तसेच ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका आणि नियोजन प्राधिकरणांनी रेल्वेची पूर्वपरवानगी (NOC) नसताना रेल्वे हद्दीपासून ३० मीटरच्या आत कोणत्याही बांधकामास परवानगी देऊ नये, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

याशिवाय, नागरिकांची दिशाभूल करून अनधिकृत बांधकामे करण्यास प्रवृत्त करणाऱ्या दलाल व संबंधित व्यक्तींविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाशी समन्वय साधला जात असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

रेल्वे हद्दीत अनधिकृत बांधकाम करण्यास कोणी प्रवृत्त करत असल्यास किंवा मोबदल्याच्या आमिषाने पैशांची मागणी करत असल्यास, नागरिकांनी डीआरएम कार्यालय, भुसावळ येथील भूमी व्यवस्थापन विभाग (Land Management Cell) यांच्याकडे तक्रार करावी. तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मध्य रेल्वे, भुसावळ विभागाने नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, रेल्वे हद्दीत कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी आवश्यक NOC घ्यावी आणि अफवा, भूलथापा किंवा मोबदल्याच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नये.