प्रभू श्रीराम केवळ प्रेमाच्या बंधनाने प्रसन्न होतात : मदन मोहनजी महाराज; लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानात रामकथा महोत्सवाला भाविकांची अलोट गर्दी :

लक्ष्मी व्यंकटेश देवस्थान येथे पाचव्या दिवशी श्रीराम-केवट प्रसंगाचे रसाळ निरूपण; पानसेमलसह परिसरातील शेकडो भाविकांची उपस्थिती

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील लक्ष्मी व्यंकटेश देवस्थान येथे राधा-कृष्ण प्रभात फेरीतर्फे आयोजित रामकथा महोत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महोत्सवाच्या पाचव्या दिवशी कथा मंडप भाविकांनी फुलून गेला असून, दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत शेकडो भाविकांनी रामकथेचा लाभ घेतला.

पाचव्या दिवसाच्या कथेत परमपूज्य मदन मोहनजी महाराज यांनी श्रीराम वनवास आणि केवट प्रसंग अत्यंत रसाळ, ओघवत्या शैलीत उलगडला. यावेळी त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामांचे जीवन प्रत्येकाने आदर्श मानून त्याचे आचरण केले पाहिजे, असे सांगितले. मानवाला सन्मार्ग दाखवण्यासाठीच भगवान नारायणांनी मनुष्यरूप धारण करून पृथ्वीवर विविध लीला केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कथेदरम्यान महाराज म्हणाले की, "भगवंताला कोणत्याही वस्तू, फळ किंवा भौतिक संपत्तीची आवश्यकता नसते. ते केवळ भक्ताच्या निस्सीम प्रेमाच्या बंधनाने प्रसन्न होतात." यावेळी त्यांनी 'उमा मर्म यह काहू न जाना' या चौपाईचा संदर्भ देत प्रभूंचे खरे मर्म जाणणे किती कठीण आहे, याचे विवेचन केले. स्वतः भगवान शंकर माता पार्वतीला प्रभूंचे गूढ समजावून सांगतात, तर २४ तास प्रभूंच्या सेवेत असलेल्या लक्ष्मणांनाही ते पूर्णपणे समजले नाही; मात्र एका साध्या, निरक्षर केवटाने प्रभूंचे मर्म ओळखले, असे त्यांनी सांगितले.

'मांगी नाव न केवट आना, कहही तुम्हारा मर्म मै जाना' या चौपाईच्या माध्यमातून केवटाच्या अखंड श्रद्धेचे आणि समर्पणाचे दर्शन घडविताना महाराजांनी सांगितले की, श्रीरामांचे चरण धुतल्याशिवाय नावेत बसू देणार नाही, हा केवटाचा आग्रह त्याच्या अतूट भक्तीचा आणि विश्वासाचा सर्वोच्च आविष्कार होता.

हा भावनिक प्रसंग ऐकताना कथा मंडपातील अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. संपूर्ण वातावरण रामनामाच्या गजराने आणि भक्तिरसाने भारावून गेले होते.

रामकथा महोत्सव दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत होत असून, भुसावळ शहरासह परिसरातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत आहेत. विशेष म्हणजे, पाचव्या दिवसाच्या कथेसाठी मध्य प्रदेशातील पानसेमल येथूनही शेकडो भाविक खास भुसावळात दाखल झाले होते. कथा समाप्तीनंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

महोत्सवाचा आता अवघा एक दिवस शिल्लक असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला आहे.