जळगाव | प्रतिनिधी प्रेमविवाह करून संरक्षणासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आलेल्या नवदाम्पत्याच्या निमित्ताने शुक्रवारी (दि. १०) रात्री जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. वाढता तणाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील युवक आणि शहरातील मेहरूण परिसरातील तरुणी यांनी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने हे नवदाम्पत्य शुक्रवारी रात्री सुमारे १०.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाले. या घटनेची माहिती मिळताच दोन्ही कुटुंबीय व नातेवाईक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले. सुरुवातीला दोन्ही बाजूंमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, काही वेळातच वाद विकोपाला गेला आणि शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले. अंदाजे ५० ते ६० जण एकमेकांसमोर आल्याने पोलीस ठाण्याच्या आवारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या गोंधळानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, या वादात एका विद्यमान नगरसेवकाच्या समर्थकांचा गट आणि एका माजी जिल्हा परिषद सदस्याच्या समर्थकांचा गट आमनेसामने आल्याची चर्चा परिसरात रंगली. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिक वाढल्याचे सांगितले जात आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाल्याची नोंद नव्हती. पोलिसांकडून संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असून, उपलब्ध पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


