अंजदे रेल्वे पुलाजवळील लूटप्रकरणाचा २४ तासांत उलगडा : रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; तीन आरोपी अटकेत, दुचाकी व मोबाईल जप्त

रावेर (प्रतिनिधी): रावेर तालुक्यातील अंजदे रेल्वे पुलाजवळ बांधकाम ठेकेदाराला चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम आणि ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे लुटल्याच्या प्रकरणाचा रावेर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलगडा करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी आणि मोबाईल जप्त करण्यात आला असून, आरोपींकडून आणखी लूटमारीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनावल येथील बांधकाम ठेकेदार शेख जाबीर शेख अमान यांना मजूर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत आरोपींनी संपर्क साधला. ठरल्याप्रमाणे त्यांना विवरा येथे बोलावून अंजदे गावाजवळील रेल्वे पुलाजवळ नेण्यात आले. तेथे दोन साथीदार आधीपासूनच थांबलेले होते. मजुरीबाबत चर्चा करण्याच्या बहाण्याने ठेकेदाराला शेतात नेल्यानंतर एका आरोपीने चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील रोख रक्कम हिसकावली. त्यानंतर मोबाईलमधील फोन-पेचा पिन जबरदस्तीने घेऊन टप्प्याटप्प्याने सुमारे ८ हजार रुपये दुसऱ्या खात्यात वर्ग करण्यात आले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेनंतर रावेर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. रात्रीची वेळ असल्याने आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. मात्र, पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने संशयितांचा शोध घेतला. चौकशीदरम्यान मुख्य आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

या प्रकरणात शेख मुस्तकीम शेख अकील (रा. फतेहनगर, रावेर), शेख मोईन शेख नईम (रा. खिर्डी रोड, विवरा) आणि फैजल बेग हितायत बेग (रा. शंकर प्लॉट, रावेर) यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली एमएच-१९ ईडी-५५८० क्रमांकाची दुचाकी तसेच मोबाईल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकावर यापूर्वीही लूटमारीचा गुन्हा दाखल आहे.

तिघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून आणखी लूटमारीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता असून, पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांचे कौतुकास्पद कामगिरी

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत आणि पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन, तुषार पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.