उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस आता दररोज धावणार; 9 जुलैपासून नवा निर्णय लागू

भुसावळ(प्रतिनिधी ) - दि. 8 जुलै : प्रवाशांची वाढती गर्दी आणि अधिक चांगल्या प्रवासी सुविधांचा विचार करून रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक 19021/19022 उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस ही आतापर्यंत आठवड्यातून तीन दिवस धावणारी गाडी आता दररोज चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवीन व्यवस्था 9 जुलै 2026 पासून लागू करण्यात येणार आहे.
यानुसार गाडी क्रमांक 19021 उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस ही 9 जुलै 2026 पासून उधना येथून दररोज धावेल. तर गाडी क्रमांक 19022 ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्सप्रेस ही 10 जुलै 2026 पासून ब्रह्मपूर येथून दररोज रवाना होईल.
या गाडीचे बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, महासमुंद, खरियार रोड, कांटाबांजी, टिटलागढ, केसिंगा, मुनिगुडा, रायगडा, पार्वतीपुरम, बोब्बिली, विजयनगरम, श्रीकाकुलम रोड आणि पलसा या स्थानकांवर थांबे आहेत.
गाडीची संरचना 11 सामान्य श्रेणीचे डबे, 8 स्लीपर श्रेणीचे डबे, 1 पॅन्ट्री कार आणि 2 दिव्यांगजन/सामान व गार्डसाठीचे डबे, अशी असून एकूण 22 डबे असतील.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना गाडीच्या धावण्याच्या दिवसांमध्ये झालेल्या बदलाची नोंद घेऊन या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा रेल्वे चौकशी क्रमांक 139 वर संपर्क साधावा.