सिंहस्थ कुंभमेळ्याची आध्यात्मिक नांदी; रामकुंड येथे ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन संपन्न :

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान देणारा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा गुरुवारी (दि. ११ जून) कमला एकादशीच्या पावन पर्वावर रामकुंड येथे मंत्रोच्चार आणि श्रीरामांच्या जयघोषात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

श्री गंगा गोदावरी पंचकोठी (तीर्थ) पुरोहित संघाच्या वतीने आयोजित या सोहळ्यास जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजा करून गंगा-गोदावरीचे पूजन करण्यात आले. शंखनाद, वेदघोष आणि उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात ध्वजस्तंभ शिलान्यासाचा विधी संपन्न झाला.

सिंहस्थ कुंभमेळ्याची ही आध्यात्मिक नांदी मानली जात असून धर्म, संस्कृती आणि मानवतेचा संदेश देणारा हा सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला. पुरोहित संघाच्या सदस्यांनी मंत्रोच्चार करून वातावरण भक्तिमय केले.

यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आगामी कुंभमेळा स्वच्छ, सुरक्षित आणि भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन, साधू-संत, महंत, सामाजिक व धार्मिक संस्था तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मागील कुंभमेळ्यापेक्षा चार ते पाचपट अधिक, म्हणजेच १२ कोटींपेक्षा जास्त भाविकांच्या आगमनाची अपेक्षा असल्याचे सांगत महाजन म्हणाले की, कुंभमेळा यशस्वी करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी विविध संघटना आणि भक्तगण पुढाकार घेत असून ही स्वच्छता सातत्याने कायम ठेवली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज म्हणाले की, आपण सर्व सनातन धर्माच्या विविध शाखा आहोत. धर्मध्वज ही आपल्या प्राचीन संस्कृतीची आणि एकात्मतेची प्रतीकात्मक परंपरा आहे. शिलान्यास म्हणजे केवळ एका वास्तूचा पाया नसून सामूहिक कल्याण, श्रद्धा, संघटन आणि शिस्त यांचा प्रारंभ आहे.

या प्रसंगी महापौर हिमगौरी आहेर-आडके, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे, माजी आमदार बाळासाहेब सानप, पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, माजी अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्यासह निर्मोही, निर्वाणी आणि दिगंबर आखाड्यांचे संत-महंत, विविध धार्मिक संस्थांचे पदाधिकारी, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.