भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे डॉ. तुषार पाटील यांना कॉमरेड्स मॅरेथॉनसाठी सदिच्छा रन

भुसावळ (प्रतिनिधी ) : दक्षिण आफ्रिकेत येत्या रविवारी होणाऱ्या जगप्रसिद्ध ९० किलोमीटर अंतराच्या कॉमरेड्स मॅरेथॉन स्पर्धेत सलग पाचव्यांदा सहभागी होत असलेल्या डॉ. तुषार पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे सदिच्छा रनचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात ५० हून अधिक महिला व पुरुष धावपटूंनी उत्स्फूर्त सहभाग घेत डॉ. पाटील यांना यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

शहरातील कृष्णचंद्र सभागृहाजवळ सकाळी ५.३० वाजता प्रवीण फालक यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्म-अपने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी ५.४० वाजता डॉ. तुषार पाटील यांच्या उपस्थितीत डीआरएम कार्यालय रोड व लोकोशेड रोड परिसरात धावण्यास प्रारंभ झाला. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ तसेच ‘तुषार दादा आगे बढो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. उत्साहपूर्ण वातावरणात धावपटूंनी एकत्रितपणे रन पूर्ण केला. सकाळी ६.२० वाजता स्ट्रेचिंग सत्र घेण्यात आले.

यानंतर मैदानावर आयोजित सत्कार समारंभात प्रवीण फालक यांनी असोसिएशनतर्फे डॉ. तुषार पाटील यांचा शाल, हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी असोसिएशनच्या विश्वस्त डॉ. चारुलता पाटील, प्रवीण वारके, गणसिंग पाटील, प्रवीण पाटील तसेच धावपटू स्वाती फालक, प्रमोद शुक्ला, सीमा पाटील, सारंग चौधरी, सायकलपटू जगदीश रेहपाडे आणि विश्वास पावरा उपस्थित होते.

यावेळी उपस्थित धावपटूंनी डॉ. पाटील यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक करत कॉमरेड्स मॅरेथॉनमध्ये उल्लेखनीय यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात डॉ. तुषार पाटील म्हणाले, “मी देखील तुमच्याप्रमाणेच असोसिएशनचा सदस्य असल्याने धन्यवाद मानणार नाही; मात्र तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा मला स्पर्धेदरम्यान प्रेरणा देतील.”

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशांत वंजारी, छोटू गवळी, सुयश न्याती, वर्षा वाडिले आणि सुधीर बेंडाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी डॉ. चारुलता पाटील व प्रवीण फालक यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवीण पाटील यांनी केले.