भुसावळातील घरफोडी प्रकरणी बाजारपेठ पोलिसांची यशस्वी कामगिरी: दोन आरोपी अटकेत, २.४९ लाखांचा मुद्देमाल जप्त :


भुसावळ (प्रतिनिधी) - पंचशील नगर परिसरातील घरफोडी प्रकरणाचा भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी तपास चक्रे फिरवून अवघ्या चार ते पाच दिवसांत यशस्वी कामगिरी करत  दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींकडून एकूण २ लाख ४९ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचशील नगर येथील रहिवासी शुभम विनायक जामनकर (वय ३२) हे १८ मे ते ७ जून २०२६ या कालावधीत बाहेरगावी गेले होते. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातून १ लाख ४६ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी करून नेले होते.

याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (१), (३) व (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना  पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयीत आरोपी सैय्यद तोहीद सैय्यद मनियार (वय २१) आणि अरबाज शेख अजमल शेख (वय २६, दोघेही रा. पंचशील नगर, भुसावळ) यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी सदर घरफोडीची    कबुली दिली. एवढेच नव्हे तर त्यांनी केलेल्या आणखी एका घरफोडीची कबुली दिल्याने एका साक्षीदाराच्या घरातून ७ ग्रॅम वजनाचे सुमारे १ लाख ३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी केल्याचेही उघड झाले.

पोलिसांनी आरोपींकडून दोन्ही गुन्ह्यांतील एकूण २ लाख ४९ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या आदेशानुसार करण्यात आली. या मोहिमेत पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, कांतिलाल केदारे तसेच योगेश माळी, प्रशांत सोनार, सचिन चौधरी, महेंद्रसिंग पाटील, जीवन कापडे, जावेद शाह, अमर अढाळे, दिलीप कोल्हे आणि अक्षय रायपुरकर यांच्या पथकाने सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतिलाल रघुनाथ केदारे करीत आहेत.