भुसावळ (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार भुसावळ उपविभागात बुधवारी (दि. 10 जून) पहाटे 5 ते 8 वाजेदरम्यान विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्यापक कारवाई करण्यात आल्याची माहिती आज बाजारपेठ येथे आयोजित पत्रकार परिषदेत अप्पर पोलिस अधिक्षक संदीप गावित यांनी दिली. या ऑपरेशनदरम्यान अवैध धंदे, शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार, फरार आरोपी, तडीपार व्यक्ती तसेच संशयितांची कसून तपासणी करण्यात आली. भुसावळ शहरातील रेल्वे स्थानक, बसस्थानक, लॉजेस आणि इतर संवेदनशील ठिकाणी झडती घेऊन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान एकूण 63 संशयितांच्या घरांची झडती घेण्यात आली. 99 आरोपींची तपासणी करण्यात आली असून 112 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 23 संशयित वाहने जप्त करण्यात आली. तसेच 54 हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांची पडताळणी करून त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात आली. गावठी कट्टा, तलवारी आणि चॉपरसह आरोपी ताब्यात कोम्बिंग ऑपरेशनमध्ये समीर शहा जब्बार शहा (रा. दीनदयाल नगर, भुसावळ) याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. तसेच शम्मी प्रल्हाद चावरिया व दानिश शेख अकील यांच्याकडून प्रत्येकी एक तलवार, तर केवल अनिल टाक याच्याकडून एक कोयता (चॉपर) जप्त करण्यात आला. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमांतर्गत चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तडीपार आरोपीसह वॉरंटधारकाला अटक जळगाव जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला संदीप बुधा खंडारे (रा. भुसावळ) हा विनापरवानगी शहरात फिरताना आढळून आला. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अन्वये कारवाई करण्यात आली. तसेच लोहमार्ग पोलीस ठाणे, खंडवा येथील अटक वॉरंटमध्ये पाहिजे असलेला सल्तनत अली इराणी (रा. पापा नगर, भुसावळ) यालाही ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी संबंधित पोलिसांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चोरीची दुचाकी हस्तगत भुसावळ शहरातील मच्छी मार्केट परिसरातून चोपडा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 84/2026 मध्ये चोरीस गेलेली सुमारे 25 हजार रुपये किंमतीची होंडा अॅक्टिव्हा दुचाकी आढळून आली. सदर वाहन पुढील तपासासाठी चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू आहे. अवैध मद्यविक्रीवर कारवाई भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हाळा बु. येथे अवैध मद्यविक्री करणाऱ्या तीन आरोपींवर छापेमारी करण्यात आली. यामध्ये 1 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या विशेष मोहिमेत प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे राहुल वाघ, तालुका पोलीस ठाण्याचे महेश गायकवाड, मुक्ताईनगरचे आशिष अडसुळ, बोदवडचे आशिष लवंगडे यांच्यासह 20 अधिकारी, 45 स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी, वाहतूक शाखेचे 27 कर्मचारी व 15 महिला पोलिसांनी सहभाग घेतला. या धडक कोम्बिंग ऑपरेशनमुळे भुसावळ शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.


