भुसावळ विभागात जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा ; पर्यावरण जनजागृती रॅली, वृक्षारोपण भरगच्च कार्यक्रम संपन्न:

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ रेल्वे विभागात दि. 05.06.2026 रोजी जागतिक पर्यावरण दिन–2026 निमित्त विविध पर्यावरणविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यासोबतच विभागातील सर्व प्रमुख स्थानके, डेपो तसेच कार्यशाळांमध्ये पर्यावरण संवर्धन व जनजागृतीसंदर्भात विविध कार्यक्रम राबविण्यात आले. मंडल रेल व्यवस्थापक कार्यालय, भुसावळ येथून पर्यावरण जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले

. ही रॅली ऑफिसर्स कॉलनीमार्गे भारत स्काउट्स अँड गाईड्स मैदानावर पोहोचली. येथे यांत्रिक विभाग, ईएनएचएम, बी टी सी (सी एन्ड डब्लू), आरपीएफ, वाणिज्य, अभियांत्रिकी, सुरक्षा, विद्युत, वैद्यकीय विभाग तसेच भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान अपर मंडल रेल व्यवस्थापक (तांत्रिक), अपर मंडल रेल व्यवस्थापक (प्रशासन) व इतर अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. भारत स्काउट्स अँड गाईड्स परिसरात 80 रोपे लावण्यात आली. याशिवाय या अभियानांतर्गत भुसावळ विभागातील विविध स्थानके व रेल्वे वसाहतींमध्ये एकूण 180 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. झेडआरटीआयच्या प्रशिक्षणार्थी तसेच स्काउट्स-गाईड्सच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण जनजागृतीवर आधारित पथनाट्य सादर केले. तसेच एका स्वयंसेवी संस्थेच्या (एनजीओ) प्रतिनिधींनी पर्यावरण संवर्धन, शाश्वत जीवनशैली व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी नागरिक व सहभागी यांना कापडी पिशव्यांचे वितरणही करण्यात आले.

जागतिक पर्यावरण दिन–2026 अभियानांतर्गत दि. 15.05.2026 ते 04.06.2026 या कालावधीत आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

अपर मंडल रेल व्यवस्थापक (तांत्रिक) व अपर मंडल रेल व्यवस्थापक (प्रशासन) यांनी उपस्थितांना संबोधित करताना पर्यावरण संरक्षण, जल व ऊर्जा बचत तसेच हरित भविष्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी वरिष्ठ मंडल यांत्रिक अभियंत्यांनी आभार प्रदर्शन केले.

या अभियानांतर्गत डीआरएच भुसावळ, अमरावती, नाशिक रोड, सेगाव स्थानक तसेच पाचोरा रेल्वे वसाहत येथे वृक्षारोपण करण्यात आले. तर मनमाड स्थानक व नांदगाव रेल्वे वसाहतीमध्ये पर्यावरण संरक्षणाची शपथ देण्यात आली. मूर्तिजापूर स्थानकावर मूर्तिजापूर स्वच्छता ग्रुप व नेहरू युवा केंद्राच्या पथकाने सक्रिय सहभाग नोंदवत प्रवाशांना पर्यावरण संरक्षणाची शपथ दिली तसेच प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा संदेश देत कापडी पिशव्यांचे वितरण केले.