भुसावळ ( प्रतिनिधी) : सुसाट वेगाने निघालेल्या स्कॉर्पिओ वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने एकाच कुटूंबातील चौघांचा करुण अंत झाला. मन विषन्न करणारा हा भीषण अपघात वरणगाव राष्ट्रीय महामार्गावरील राष्ट्रीय महामार्गावरील हिरा मारोती मंदिर, मोहम्मद पुरा नाल्याजवळ शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला. मृतांमध्ये सख्या बहिण-भावासह कुटूंबातील सदस्यांचा समावेश आहे. अपघातानंतर वरणगाव पोलिसांनी धाव घेत अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतले. सर्व मयत वरणगावजवळील कपिल वस्तीनगरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.

मृतांमध्ये विजय शंकर काळे (30), ऐश्वर्या बहादुर भोसले (30) व विघ्नेश शंकर चव्हाण (14) व मोनालिसा शंकर चव्हाण (4, सर्व रा. कपिल वस्तीनगर, भुसावळ) या बहिण-भावंडांचा समावेश आहे.
मोनालिसा चव्हाण या चार वर्षीय बालिकेला बरे नसल्याने कुटूंबातील सदस्य कपिल वस्ती नगर भागातील घरातून दुचाकी (एम.एच.22-3681) ने निघाल्यानंतर महामार्गावरील हिरा मारोती मंदिर, मोहम्मद पुरा नाल्याजवळ भरधाव स्कॉर्पिओ (एम.एच.19-5353) ने दुचाकीला जबर धडक दिल्याने कुटूंबातील सदस्य जबर जखमी झाले व वरणगाव व जिल्हा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघातात दुचाकी व स्कॉर्पिओ वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर स्कॉर्पिओ चालकही जखमी झाला. अपघातानंतर नागरिकांनी धाव घेत जखमींना वरणगाव व जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यासाठी मदत केली. मृताच्या नातेवाईकांनी चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आह
वरणगावचे सहाय्यक निरीक्षक अमित बागुल यांच्यासह सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वाहतूक सुरळीत करून अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली तर सायंकाळी उशिरा जळगावहून फॉरेन्सिक टीमही दाखल झाली.


