महिला पर्यावरण मंचचा आगळावेगळा पर्यावरण दिन; प्लास्टिक बॉटल संकलन युनिटचे लोकार्पण

भुसावळ (प्रतिनिधी ) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दरवर्षी वृक्षारोपणाचे विविध उपक्रम राबविले जातात. मात्र, भुसावळमधील वाढते तापमान आणि पावसाअभावी जून महिन्यात लावण्यात आलेली अनेक झाडे टिकून राहत नाहीत. याच पार्श्वभूमीवर महिला पर्यावरण मंचाने यंदाचा पर्यावरण दिन एका वेगळ्या उपक्रमाद्वारे साजरा करत प्लास्टिक बॉटल संकलन युनिटचे लोकार्पण केले.

महिला पर्यावरण मंचच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी पाणी व ऊर्जा बचत, जैवविविधता संरक्षण तसेच प्लास्टिक बॉटल आणि प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर कमी करण्यासाठी सातत्याने जनजागृती केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून ५ जून रोजी भुसावळ शहरातील नागरिकांसाठी प्लास्टिक बॉटल संकलन युनिट सुरू करण्यात आले.

या उपक्रमाचे उद्घाटन सिटी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक हर्षा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. महिला पर्यावरण मंचने स्वतःच्या खर्चातून लोखंडी तारेपासून बॉटलच्या आकाराचे हे विशेष संकलन युनिट तयार केले आहे.

गांधी पुतळ्याजवळील चौपाटी परिसरात अनेक हॉटेल्स असून, तेथे पाणी पिल्यानंतर रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या रस्त्यावर किंवा गटारांमध्ये फेकल्या जात असल्याचे लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या युनिटच्या वरच्या भागात विशेष छिद्र ठेवण्यात आले असून त्यामधून नागरिक रिकाम्या बाटल्या जमा करू शकतात. युनिट पूर्ण भरल्यानंतर महिला पर्यावरण मंच या बाटल्यांचा पुनर्वापर (री-यूज) करण्यासाठी उपयोग करणार आहे.

यावेळी मंचाच्या अध्यक्षा शालिनी वाढेकर यांनी भुसावळकरांना आवाहन करताना सांगितले की, नागरिकांनी आपल्या घरातील रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्याही कोर्टासमोरील गार्डनजवळ उभारण्यात आलेल्या या संकलन युनिटमध्ये जमा कराव्यात आणि पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमात सहभागी व्हावे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंचाच्या सचिव वैशाली सैतवाल, शुभांगी चौधरी, सुनंदा औंधकर, लिपिका राऊत, जयश्री इंगळे, अनिता आंबेकर आदींनी विशेष सहकार्य केले.

यावेळी सोनाली राणे, रंजना वराडे, प्रतिभा गायकवाड, वंदना मालविया, शिप्रा विश्वास, रीता मंडल, नीलिमा समंदर यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.