मे 2026 मध्ये भुसावळ विभागाला 85.45 कोटी रुपयांचा प्रवासी महसूल; उद्दिष्टापेक्षा 2.40 टक्के अधिक प्राप्ती


भुसावळ (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने मे 2026 महिन्यात प्रवासी वाहतुकीतून महसूल प्राप्तीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विभागाला आरक्षित व अनारक्षित तिकिटांच्या विक्रीतून एकूण 85.45 कोटी रुपयांचा प्रवासी महसूल प्राप्त झाला आहे. ही प्राप्ती निर्धारित उद्दिष्टापेक्षा 2.40 टक्के अधिक असून मे 2025 च्या तुलनेत 20 टक्क्यांची वाढ दर्शविते.
या यशामध्ये आरक्षित तसेच अनारक्षित प्रवासी वर्गांमधील सातत्यपूर्ण वाढीचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. मे 2026 मधील महसूलाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –
आरक्षित प्रवासी महसूल : 47.47 कोटी रुपये, जो मे 2025 च्या तुलनेत 28 टक्के अधिक आहे.
अनारक्षित प्रवासी महसूल : 37.98 कोटी रुपये, जो मे 2025 च्या तुलनेत 11 टक्के अधिक आहे.
प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, कार्यक्षम संचालन सुनिश्चित करणे आणि ग्राहक समाधान वाढविण्यासाठी भुसावळ विभागाने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
प्रवासी उत्पन्नातील ही सातत्यपूर्ण वाढ विभागाच्या धोरणात्मक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीचे तसेच रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या विश्वासाचे प्रतीक मानली जात आहे.
भुसावळ विभाग भविष्यातही सुरक्षित, वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण रेल्वे सेवा देण्यासाठी कटिबद्ध असून प्रवाशांना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.