जागतिक धावपटू दिनानिमित्त भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचा विशेष रनिंग उपक्रम उत्साहात

भुसावळ (प्रतिनिधी ) – जागतिक धावपटू दिन (Global Running Day 2026) निमित्त भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे बुधवार (दि. ३ जून) रोजी कृष्णचंद्र हॉल परिसरात विशेष रनिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ६ ते ७ या वेळेत झालेल्या या उपक्रमात असोसिएशनच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत फिटनेस, आरोग्य आणि नियमित व्यायामाचा संदेश दिला.

लोकोशेड रोड मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या या रनमध्ये सहभागी धावपटूंनी ५ ते ७ किलोमीटर अंतर एकत्रित धावून पूर्ण केले. धावण्यापूर्वी प्रवीण पाटील यांनी सर्व सहभागींसाठी वॉर्म-अप सत्र घेतले, तर धाव पूर्ण झाल्यानंतर मैदानावर स्ट्रेचिंगचे मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमात रीना परदेशी, सुनीता सिंग, सविता वाघमारे, मनिषा सिंग, सारंग चौधरी, प्रशांत वंजारी, प्रमोद शुक्ला, सुयश न्याती, गरिमा न्याती, संजय तिवारी, पुष्पा तिवारी, डॉ. पंकज ठाकरे, शिला कश्यप, गुंजन गुप्ता, शुभांगी पाटील, पिंकी सिंग, विनीता चौधरी, सुधीर बेंडाळे, सायली बेंडाळे, मंगेश चंदन, एकता भगत आणि प्रवीण पाटील यांच्यासह अनेक धावपटूंनी सहभाग नोंदविला.

भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन ही संस्था शहरात धावण्याची संस्कृती रुजविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. संस्थेचे सदस्य दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी नियमित धावण्याचा सराव करतात. तसेच देशातील विविध शहरांमध्ये आयोजित नामांकित मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी करत भुसावळचे प्रतिनिधित्व करतात.

जागतिक धावपटू दिनानिमित्त आयोजित या उपक्रमाद्वारे नियमित धावण्यामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहते, हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व धावपटूंनी निरोगी, सक्रिय आणि फिट जीवनशैलीचा संकल्प केला.