भुसावळ (प्रतिनिधी) : रावेर विधानसभा मतदारसंघातील रावेर व यावल तालुक्यात १ जून २०२६ रोजी झालेल्या जोरदार वादळामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई देऊन सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार यांनी मुख्यमंत्री तसेच मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वादळाच्या तडाख्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा जमीनदोस्त झाल्या असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रावेर-यावल परिसरात केळी हे प्रमुख नगदी पीक असल्याने या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार अमोल जावळे यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानाची अचूक नोंद घेण्याची मागणी केली आहे. तसेच विशेष बाब म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई मंजूर करून त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
यासंदर्भात आमदार जावळे यांनी मुख्यमंत्री तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही स्वतंत्र निवेदन सादर केले असून, रावेर-यावल परिसरातील शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्याची मागणी केली आहे.
संकटाच्या काळात शेतकऱ्यांना शासनाची भक्कम साथ मिळावी आणि नुकसानग्रस्तांना त्वरीत आर्थिक मदत मिळावी, यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त केली आहे.


