जागतिक पर्यावरण दिन २०२६ : भुसावळ रेल्वे विभागात “जल व ऊर्जा संवर्धन” विषयावर पर्यावरण जनजागृती अभियान

मनमाड व मलकापूर स्थानकांवर जनजागृती रॅली; जलसंवर्धन, ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश

भुसावळ( प्रतिनिधी ) – जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात “जल व ऊर्जा संवर्धन” या विषयावर विविध पर्यावरण जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विभागातील रेल्वे स्थानके, रेल्वे वसाहती तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये पर्यावरण संरक्षण, जल व ऊर्जा संवर्धन आणि स्वच्छतेशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज मनमाड व मलकापूर रेल्वे स्थानकांवर विशेष पर्यावरण जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले. या अभियानात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असून रेल्वे कर्मचारी व हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रॅलीद्वारे प्रवासी, रेल्वे वापरकर्ते तसेच रेल्वे वसाहतीतील नागरिकांना जलसंवर्धन, पावसाच्या पाण्याचे संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) आणि पाण्याचा जबाबदारीने वापर करण्याबाबत जागरूक करण्यात आले.

ऊर्जा बचतीसाठी एलईडी प्रकाशयंत्रणांचा वापर, वातानुकूलन यंत्रांचा आवश्यकतेनुसार वापर तसेच गरज नसताना विद्युत उपकरणे बंद ठेवण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला. पर्यावरणपूरक आणि शाश्वत जीवनशैली स्वीकारण्यासाठी विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

अभियानादरम्यान पुनर्वापर (रिसायकलिंग) व कंपोस्टिंगला प्रोत्साहन देण्यात आले. तसेच जलसंवर्धन आणि जल पुनर्चक्रणाशी संबंधित विविध प्रणालींची पाहणी करण्यात आली. यामध्ये एसीडब्ल्यूपी (ACWP) प्रणाली, क्लीन-एनपी, जलाशय व सम्प्सचे पुनरुज्जीवन तसेच जल पुनर्चक्रण व्यवस्थेचा समावेश होता. या माध्यमातून जलस्रोतांचा कार्यक्षम आणि जबाबदारीने वापर करण्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थितांना पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, जल व ऊर्जा बचत तसेच हरित आणि शाश्वत जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरित करण्यात आले. तसेच प्लास्टिक प्रदूषण कमी करून स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले.

मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग पर्यावरण संरक्षण, जल व ऊर्जा संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत विकासाबाबत आपली बांधिलकी कायम ठेवत असून भविष्यातही अशा जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आला.