भुसावळ (प्रतिनिधी ) – श्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला नागरिक संघातर्फे श्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती तसेच संघाचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. येथील श्रीराम मंदिर येथे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर श्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.


कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रश्मी शर्मा, मुक्ताईनगर येथील राजकन्या जोगी, स्वलिखित भारुड रचयित्या तथा खान्देश कन्या श्रीमती विमल वाणी तसेच ज्येष्ठ महिला नागरिक संघाच्या अध्यक्षा श्रीमती सुनंदा औंधकर व्यासपीठावर उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला अभिवादन करताना त्यांच्या लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायप्रियता, सुशासन आणि समाजसेवेच्या आदर्शांचा गौरव केला. समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देत जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा केवळ स्मरणात न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीतून जपणे व समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत राजकन्या जोगी यांनी आपल्या प्रभावी कीर्तनातून समाजप्रबोधन केले. “काळ बदलला, इतिहास बदलला, कॉन्व्हेंट संस्कृतीची आवड वाढली आणि आपला जाज्वल्य, तेजस्वी इतिहास विस्मृतीत जात आहे. भारतीय संस्कृती लोप पावत असल्याची खंत वाटते,” असे सांगत त्यांनी न्याय, धर्म, करुणा आणि उत्तम आचरण यांचे महत्त्व विशद केले. समाजमनावर चांगल्या आचरणाचा सकारात्मक परिणाम होत असल्याचे सांगत पुस्तकी ज्ञानासोबत अध्यात्म, संस्कृती आणि इतिहास जाणून घेण्याची आजच्या पिढीला गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. “जगाच्या बाजारात प्रेम आणि हरिनाम कुठेही विकत मिळत नाही,” या संदेशातून त्यांनी उपस्थितांना आध्यात्मिक मूल्यांचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी वयाच्या ८४ व्या वर्षातही उत्साहाने कार्यरत असलेल्या स्वलिखित भारुड रचयित्या श्रीमती विमल वाणी यांनी सुंदर भारुड, भजने आणि गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणातून आजच्या पिढीसमोर संस्कार, अध्यात्म आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श संदेश आपल्या भारूडांमधून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ रश्मि शर्मा यांनी जेष्ठ महिला नागरिक संघाचे यशस्वी कार्याचे कौतुक करून मंडळास सर्वोतोपरी सहकार्य करणार असे आश्वासन देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संघ अध्यक्ष सुनंदा औंधकर यांनी संघाच्या विविध उपक्रमाची विस्तृत माहिती प्रास्ताविकात दिली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव सीमा डोलारे यांनी केले तर आभार प्रदर्शन सरोज कवीश्वर. यांनी केले यावेळी संघातील सदस्यांना विविध पारितोषक देऊन सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमात अहिल्यादेवी संघाने आपला पहिला पुण्यश्लोक अहिल्यादेवी नारी रत्न पुरस्कार सौ.रजनीताई सावकारे यांना जाहीर केला त्यांच्या कार्याचा लेखाजोखा सन्मान पत्रात सांगण्यात आला. तसेच सघगौरव पुरस्कार आदरणीय अलका ढाके यांना तर विशेष सहकार्य बद्दल सरला चौधरी,सीमा डोलारे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले तसेच उत्कृष्ट सादरीकरण विद्या रामवशी आणि उत्कृष्ट प्रश्नमंजुषा सादरीकरण साठी सौ. जयश्री ढाके यांना गौरविन्यात आले तर यावेळी जेष्ठ सदस्यांना अधकमासनिमित्त प्रभा पाटील यांनी पुस्तक रुपी वाण देऊन सत्कार करण्यात आला

संघाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सीमा डोलारे सरोज कवीश्वर महानंदा पाटील अलका ढाके प्रभा पाटील विजया निकम, आदी सदस्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास सौ अनिता आंबेकर, ॲड जास्वंदी भंडारी, पत्रकार उज्वला बागुल, यांचेसह ज्येष्ठ महिला नागरिक संघाच्या सदस्यांसह अनेक महिला , नागरिक बंधू आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


