भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ रेल्वे विभागातून एक अत्यंत मानवतावादी आणि प्रेरणादायी घटना समोर आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आणि तत्परतेमुळे धावत्या रेल्वेत एका गर्भवती महिलेची सुरक्षित प्रसूती होऊन तिने निरोगी बाळाला जन्म दिला.

ही घटना ३० मे २०२६ रोजी घडली. गाडी क्रमांक १५९४५ मध्ये भुसावळ ते इटारसी दरम्यान ड्युटीवर असलेले SRCCTC भुसावळचे कर्मचारी अंबरीश कुमार तिवारी आणि कंडक्टर एस. पी. फिर्के हे नियमित कामकाजात व्यस्त होते. सायंकाळी सुमारे ५.२५ वाजता रवी चौधरी हे आपल्या गर्भवती पत्नी ज्योती यांच्यासह त्यांच्याकडे आले.
ज्योती यांना अचानक तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्याची माहिती त्यांनी कर्मचाऱ्यांना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ मानवतेचे दर्शन घडवत बी-६ डब्याच्या गॅलरीत स्वच्छ जागा तयार केली. तेथे चादरी व ब्लँकेट अंथरून प्रसूत महिलेला आरामदायी व्यवस्था करून देण्यात आली.
याचवेळी सायंकाळी ५.२८ वाजता भोपाल कंट्रोलला माहिती देऊन हरदा स्थानकावर डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आवश्यक वैद्यकीय मदतीची व्यवस्था करण्याची विनंती करण्यात आली. कंट्रोलकडून तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत सर्व व्यवस्था करण्याचे आश्वासन देण्यात आले.
मात्र, हरदा स्थानक येण्यापूर्वीच डब्यातील महिला प्रवाशांच्या मदतीने आणि कंडक्टर एस. पी. फिर्के यांच्या उपस्थितीत ज्योती यांनी सायंकाळी सुमारे ५.४० वाजता एका निरोगी मुलाला जन्म दिला. धावत्या रेल्वेत नवजात बालकाच्या किलबिलाटाने संपूर्ण डब्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यानंतर सायंकाळी ६.०७ वाजता गाडी हरदा स्थानकावर पोहोचली. तेथे आधीपासून उपस्थित असलेले RPF कर्मचारी बी. पी. पांडेय, स्थानक कर्मचारी आर. के. खरे, महिला पोलीस कर्मचारी आणि हेल्पर यांच्या मदतीने माता व नवजात बालकाला सुरक्षितपणे रुग्णालयात हलविण्यात आले. त्या वेळी बाळाची नाळ अद्याप कापलेली नसल्याने दोघांनाही तातडीने वैद्यकीय देखरेखीखाली दाखल करण्यात आले.
या संपूर्ण घटनेत रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखविलेली तत्परता, संवेदनशीलता आणि मानवता कौतुकास्पद ठरली आहे. संकटाच्या क्षणी प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वे प्रशासन नेहमीच सज्ज असल्याचे या घटनेतून दिसून आले आहे.
धावत्या रेल्वेत जन्मलेल्या या चिमुकल्या पाहुण्याला आणि त्याच्या मातेला निरोगी व सुखी आयुष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.


