दिड लाखांच्या लाच प्रकरणात मोठा खुलासा; उपनिबंधक जगदीश बारी यांच्या लॉकरमधून तब्बल १.०७ कोटींचे घबाड जप्त

भुसावळ (प्रतिनिधी) : दिड लाखांच्या लाच प्रकरणात अटकेत असलेल्या जळगाव सहकारी संस्थांचे उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी यांच्या लॉकरमधून तब्बल १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने भुसावळ येथे येऊन आरोपीच्या घरासह लॉकरची झडती घेत ही मोठी कारवाई केली.

असे आहे लाच प्रकरण

एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध अवैध सावकारी संदर्भात कारवाई सुरू होती. या प्रकरणाची सुनावणी उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव कार्यालयात सुरू होती. तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये तसेच अवैध सावकारी चौकशी अहवाल अनुकूल पाठवण्यासाठी उपनिबंधक जगदीश बारी यांनी सुरुवातीला ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर तडजोडीअंती ही रक्कम ३ लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली. त्यातील पहिला हप्ता म्हणून दिड लाख रुपये स्वीकारण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार बुधवार, २० मे रोजी एसीबीने सापळा रचला.

या कारवाईदरम्यान आरोपी देविदास धनसिंग पाटील यांनी जळगाव जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशन लिमिटेड, नेहरू मार्केट, जळगाव येथे तक्रारदाराकडून दिड लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर मुख्य आरोपी जगदीश बारी यांनाही अटक करण्यात आली.

भुसावळातील लॉकरमधून कोट्यवधींचे घबाड

एसीबीने पुढील तपासादरम्यान भुसावळ येथील Cosmos Bank मधील जगदीश बारी यांच्या लॉकरची झडती घेतली. या झडतीत तब्बल ९९ लाख ४ हजार ९६० रुपयांचे सोन्याचे दागिने, ८ लाख ३६ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम तसेच चांदीचे दागिने असा एकूण १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणामुळे सहकारी संस्था विभागात मोठी खळबळ उडाली असून एसीबीकडून आरोपींच्या मालमत्ता व आर्थिक व्यवहारांचा अधिक तपास सुरू आहे.