अमरावती – सूरत एक्सप्रेस आता एलएचबी कोचसह धावणार; प्रवाशांना मिळणार अधिक सुरक्षित व आरामदायी प्रवास

भुसावळ (प्रतिनिधी ) –
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि आधुनिक प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने अमरावती – सूरत एक्सप्रेसच्या अप व डाउन दिशेतील पारंपरिक आयसीएफ रेकऐवजी अत्याधुनिक एलएचबी रेकचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यानुसार,

गाडी क्रमांक 20926 अमरावती – सूरत एक्सप्रेस अमरावती येथून दिनांक 29 मे 2026 पासून एलएचबी कोचसह धावेल.

गाडी क्रमांक 20925 सूरत – अमरावती एक्सप्रेस सूरत येथून दिनांक 28 मे 2026 पासून एलएचबी कोचसह धावेल.

सुधारित डब्यांची रचना

या गाडीमध्ये एकूण 16 डबे असतील. त्यामध्ये 1 वातानुकूलित चेअर कार , 4 द्वितीय श्रेणी चेअर कार , 2 स्लीपर क्लास , 7 सामान्य द्वितीय श्रेणी डबे , 1 लगेज सह गार्ड ब्रेक व्हॅन , 1 जनरेटर व्हॅन
अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, एलएचबी कोच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून त्यामध्ये उत्तम सस्पेन्शन, अधिक स्थिरता आणि प्रगत सुरक्षा सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सुकर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

प्रवाशांनी तिकीट बुकिंगसाठी RailOne ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी NTES व रेल्वे चौकशी संकेतस्थळ ला भेट देण्याचे सांगण्यात आले आहे.