भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील चोरवड गावाजवळ कुऱ्हा पानाचे रस्त्यावर मंगल वस्ताद ढाब्याजवळ झालेल्या भीषण अपघातात मोंढाळा येथील एका मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. २०) सायंकाळी घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डंपर क्रमांक एमएच १९-४९११ हे कुऱ्हा पानाचे येथून भुसावळकडे जात होते. त्याचवेळी भुसावळकडून कुऱ्हा पानाचे गावाकडे जाणारी मोटरसायकल क्रमांक एमएच १९ ईसी ३२३४ यास डंपरची जोरदार धडक बसली. या भीषण धडकेत मोटरसायकलस्वार मनोज पांडुरंग वाघ (वय ३९, रा. मोंढाळा ता. भुसावळ) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
मयत मनोज वाघ यांचे मोंढाळा येथे सलूनचे दुकान असून ते कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे वाघ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. मनोज वाघ हे मनमिळाऊ स्वभावामुळे परिसरात परिचित असल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, घटनेचा पंचनामा सुरू असून पुढील तपास भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ धिरज मंडलिक करीत आहेत.


