भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील भरवस्तीत गजबजलेल्या भागातील बाटा चौक परिसरात अचानक एका होंडा युनिकॉर्न दुचाकीला आग लागल्याची घटना घडली. यामुळे काही काळ एकच गोंधळ उडाला. पंजाब स्पोर्ट्स आणि भाटिया वॉच दुकानाजवळ उभी असलेल्या या दुचाकीत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पंजाब स्पोर्ट्स जवळ उभ्या असलेल्या दुचाकीतून अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्याने येथे नागरिकांनी भीती पोटी पळापळ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले . यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले नगरसेवक सोहेल पठाण यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ पाण्याची व्यवस्था केली. व स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी दुचाकीवरील आग आटोक्यात आणली.
वेळीच आग विझवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा आजूबाजूला उभ्या असलेल्या वाहनांसह परिसरातील दुकानांनाही आगीचा फटका बसण्याची शक्यता होती.या घटनेमुळे काही काळ बाटा चौक परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र नगरसेवक सोहेल पठाण यांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सोहेल पठाण यांच्या धाडसाचे आणि तत्परतेचे कौतुक करत, त्यांच्या योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे मोठे नुकसान टळल्याची भावना व्यक्त केली.


