भुसावळ (प्रतिनिधी)- महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर टप्पा क्रमांक १ अंतर्गत वरणगाव महसूल मंडळाचे शिबिर दि.१५ रोजी वरणगाव नगरपरिषद आवारात उत्साहात संपन्न झाले. शिबिरास वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष अरुणा इंगळे, भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी तहसीलदार नीता लबडे यांनी प्रास्ताविकात शिबिराच्या उद्देशाविषयी माहिती दिली. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना दिली. तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदार श्रीमती पूजा अवघडे यांनी सामाजिक अर्थसहाय्य योजनांमधील बदलांविषयी मार्गदर्शन केले. श्रीमती प्रीती लुटे यांनी जनगणना २०२७अंतर्गत पहिला टप्पा, घरगणना व स्वगणना याबाबत माहिती दिली. महिला व बालविकास अधिकारी श्रीमती रोझटकर यांनी एकल पाल्य योजना व वात्सल्य योजना याविषयी नागरिकांना मार्गदर्शन केले. तहसीलदार नीता लबडे यांनी नागरिकांनी स्वगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून प्रगणकांना अचूक माहिती द्यावी तसेच प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन विलास पाटील यांनी तर आभार ग्राम महसूल अधिकारी रेणुका पाटील यांनी मानले. कार्यक्रमात मंडळ अधिकारी रजनी तायडे व सुप्रिया बिराजदार यांनीही मार्गदर्शन केले,
शिबिरात वितरित करण्यात आलेले प्रातिनिधिक लाभपुढीलप्रमाणे विशेष सहाय्य योजना लाभ २९. ई-शिधापत्रिका ९०, उत्पन्न, जात व अधिवास प्रमाणपत्र वाटप १२५०, जिवंत ७/१२ उतारे ५५, माझा ७/१२ अचूक ७/१२ विशेष मोहिमेत
सुधारित ७/१२ उतारे ८२, अपाक शेरा कमी ९, फेरफार निर्गती ६५, तुकडा शेरा कमी २०, लेक लाडकी बेबी किट वाटप ३, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घर पूर्ण झालेल्या लाभाव्यर्थ्यांना चावी वितरण १, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत बांधकाम परवाना वितरण २. या शिबिरास सुमारे ६५० लाभार्थी व नागरिक उपस्थित होते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


