वरणगाव ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा काळ्या फिती लावून निषेध

भुसावळ (प्रतिनिधी) –

वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी काळ्या फिती लावून कामकाज करत काल घडलेल्या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदविला. दिवसभर रुग्णालय परिसरात शांततापूर्ण पद्धतीने निषेध व्यक्त करत कर्मचारी आपले नियमित कर्तव्य बजावत होते.

दि.१३ मे रोजी वरणगाव महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सतीश विश्वनाथ बाविस्कर (वय ५५) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना सायंकाळी सुमारे ६.३० वाजता वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात रेफर केले. मात्र, अत्यावश्यक असलेली १०८ रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने रुग्णाला सुमारे ७.१० वाजता रुग्णवाहिका मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर

शासकीय कामकाजात अडथळ्याचा आरोप

रुग्णाला जळगाव येथे हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान रात्री ९.२० वाजता त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर वरणगाव परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. काही लोकप्रतिनिधी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात ठिय्या

आंदोलन करत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचा, तसेच शिवीगाळ व अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला असून रुग्णालयातील नियमित सेवा, विशेषतः गरोदर माता तपासणी

व बाह्यरुग्ण विभागाचे कामकाज काही काळ विस्कळीत झाल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

रुग्णावर योग्य उपचार करूनही आमच्यावर खोटे आरोप करण्यात आले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर दबाव आणणे ही गंभीर बाब आहे, अशी भावना कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रकाराच्या निषेधार्थ सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून दिवसभर कामकाज सुरू ठेवत शांततेत निषेध नोंदविला. दरम्यान, संपूर्ण घटनेची चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन कर्मचाऱ्यांनी शासनाला सादर केले आहे.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन अहिरे यांच्यासह परिचारिका संगीता ढाके, पल्लवी सुरवाडे, शितल बोदडे, मोहिनी सोनवणे, प्रवीण पाटील, महेंद्र सोळंके, मनोज तायडे, माधुरी चांडले, ज्योती गुरव, सुजाता कोल्हे, इरफान पठाण, आकाश मेढे, भारती निकम, प्रकाश पाचपांडे आदी कर्मचारी उपस्थित होते