काळा हनुमान सोसायटीच्या मालमत्ता लिलावाचे आदेश; ठेवीदारांना दिलासा

भुसावळ (प्रतिनिधी)-
श्री काळा हनुमान अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेवर जप्ती आणून लिलाव करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या तातडीच्या अंमलबजावणीसाठी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाने प्राधिकृत अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

भुसावळ येथील ठेवीदार सतीश दिगंबर गोळीवाले व माधवी सतीश गोळीवाले यांनी संस्थेत ठेव स्वरूपात गुंतवणूक केली होती. मात्र मुदत पूर्ण होऊनही ठेवीची रक्कम परत न मिळाल्याने त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, जळगाव येथे तक्रार क्रमांक ०१/२०२२ दाखल केली होती.

या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर ग्राहक आयोगाने नवीन ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम २५ व ७१ अंतर्गत संस्थेविरोधात अंतिम आदेश पारित केला. आदेशानुसार संबंधित संस्थेच्या संचालकांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून ती लिलावाद्वारे विक्री करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यातून ठेवीदारांची थकित रक्कम वसूल करण्यात येणार आहे.

दरम्यान, सहाय्यक निबंधकांनी ७ मे रोजी जारी केलेल्या पत्राद्वारे एस. डी. उचित यांची या जप्ती व लिलाव प्रक्रियेसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ही संपूर्ण कार्यवाही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

या कारवाईमुळे ठेवीदारांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली असून, सहकारी संस्थांमधील आर्थिक गैरव्यवहारांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.