भुसावळात अपघातग्रस्तांना त्वरित मदतीसाठी कार्यशाळा उत्साहात

भुसावळ (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा पोलिस दल

आणि डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व गोदावरी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अपघातग्रस्तांना त्वरित मदत’ या विषयावर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली. रस्ते अपघातांमध्ये जखमींना वेळेत प्रथमोपचार मिळाल्यास त्यांचे प्राण वाचण्याची शक्यता वाढते, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन केले होते.

जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित यांनी मार्गदर्शन केले. उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांनीही अंमलदारांना महत्त्वपूर्ण

सूचना दिल्या.

कार्यशाळेत डॉ. उल्हास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील व डॉ. सतीश यांनी प्रथमोपचार किटचा योग्य वापर तसेच अपघातग्रस्तांना सुरक्षितरित्या हाताळण्याचे प्रशिक्षण दिले. यावेळी ‘सीपीआर’चे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही घेण्यात आले.

कार्यशाळेत सावदा पोलिस स्टेशनचे विशाल पाटील आणि भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे राहुल वाघ यांनी शासकीय योजनांची माहिती दिली.

कार्यशाळेस प्रभारी अधिकारी उद्धव डमाळे, महेश गायकवाड, अमित बागुल, अडसूळ, सहा. पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्यासह पेट्रोल पंप चालक, हॉटेल व्यावसायिक व नागरिक उपस्थित होते.