मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल उद्या, ८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाने याबाबत अधिकृत घोषणा केली असून, राज्यातील सुमारे १६ लाखांहून अधिक विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

निकाल कुठे आणि कसा पाहायचा?
विद्यार्थ्यांना आपला निकाल अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला सीट नंबर (रोल नंबर) आणि आईचे नाव प्रविष्ट करावे लागेल.
अधिकृत वेबसाईट्स:
- results.digilocker.gov.in
- mahahsscboard.in
- sscresult.mkcl.org
- results.targetpublications.org
- results.navneet.com
गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेची प्रत
निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबाबत शंका असेल, त्यांना गुणपडताळणी तसेच उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ही प्रक्रिया निकाल लागल्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
ऑनलाइन निकाल पाहिल्यानंतर त्याची प्रिंट किंवा PDF सेव्ह करून ठेवावी.
निकालाच्या वेळी वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक येण्याची शक्यता असल्याने सर्व्हर संथ होऊ शकतो. अशावेळी संयम ठेवून काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.
यंदाही डिजीलॉकरवर डिजिटल मार्कशीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जे विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण ठरतील, त्यांच्यासाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुनर्परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही.


