महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. वादळी हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर हवेतच अडकले होते. मात्र, पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे महालक्ष्मी रेसकोर्स येथून मुरबाड येथे एका विवाह सोहळ्यासाठी रवाना झाले होते. दरम्यान, त्यांचे हेलिकॉप्टर कल्याण परिसरात पोहोचताच अचानक वातावरणात मोठा बदल झाला आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी परिस्थिती निर्माण झाली. याचदरम्यान हेलिकॉप्टर वादळात अडकल्याने काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
समोर आलेल्या माहितीनुसार, तब्बल १० ते १५ मिनिटे हेलिकॉप्टर वादळी परिस्थितीत अडकून होते. जोरदार वाऱ्यामुळे हेलिकॉप्टरला स्थिर ठेवणे कठीण जात होते. मात्र, पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. परिस्थितीचा अंदाज घेत अखेर हेलिकॉप्टरचे जुहू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
या हेलिकॉप्टरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, विशेष कार्य अधिकारी बालसिंह राजपूत, जनसंपर्क विभागाचे विशेष कार्य अधिकारी विनायक पात्रुडकर, सुरक्षा रक्षक तसेच विमान कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली परिसरात अचानक हवामान बदलल्याने नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.
या घटनेनंतर राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली असून, पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


