भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ येथील मध्य रेल्वे उच्च माध्यमिक इंग्रजी माध्यम शाळेमध्ये १०० दिवस क्षयरोग मुक्त भारत अभियानांतर्गत क्षयरोग जनजागृतीसाठी३० एप्रिल २०२६ रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन विभागीय रेल्वे रुग्णालय भुसावळ द्वारे करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती करणे तसेच त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे हा होता.

सदर कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रेश्मी जी. विभागीय मेडिकल अधिकारी, एएनओ सुवर्णा कांबळे व उपमुख्याध्यापिका स्वाती चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या स्पर्धेत ११ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी क्षयरोग जनजागृती या विषयावर आधारित अत्यंत सुंदर व कल्पक चित्रे सादर केली. त्यांनी क्षयरोग प्रतिबंध, नियमित उपचारांचे पालन, स्वच्छता, पोषण आणि लवकर निदान या महत्त्वाच्या बाबींवर आपली मते चित्रांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडली. या कार्यक्रमात एकूण ४० लाभार्थ्यांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्षयरोग निर्मूलनाबाबत जागरूकता निर्माण झाली. शाळा प्रशासन, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाच्या शेवटी ‘क्षयरोग मुक्त भारत’ घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा संदेश देण्यात आला.



