जिल्ह्यातील रेशनींग धान्याचा इष्टांक वाढवून द्या -मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे राष्ट्रवादीची मागणी :

निकड

भुसावळ (प्रतिनिधी )-:जळगाव जिल्ह्यातील नवीन शिधापत्रिकांची संख्या वाढल्याची बाब लक्षात घेऊन संपूर्ण जिल्ह्यातील युनिटनुसार लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याला सुधारित इष्टांक मंजूर करण्यात यावा,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष व भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन रेशनिंग धान्याचा इष्टांक वाढवून मिळावा अशी मागणी केली. यावेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यातील स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या गोरगरिबांसाठी रेशनींग मालाचा इष्टांक वाढवण्याची लेखी मागणी करत या मुद्द्याबाबत नमूद केले की,जिल्ह्यात पुरवठा विभागाने बोगस रेशनिंग कार्डांची शोध मोहीम राबवल्यानंतर धान्य पुरवठ्याचा इष्टांक कमी झाला आहे.मात्र त्यानंतरच्या कालावधीत नव्या शिधापत्रिकाधारकांची संख्या व युनिटची संख्या वाढून सुद्धा इष्टांकाच्या आधारे पुरेसे रेशनिंगचे धान्य जिल्ह्याला मिळत नसल्याने अडचणी येत आहेत.कमी धान्याचा पुरवठा होत असल्याने स्वस्त धान्य दुकानावर अवलंबून असलेले अनेक गोरगरीब लाभार्थी हे दरमहा आपल्या हक्काच्या रेशनिंग असून वंचित राहत आहेत.
उपाययोजना करण्याची ग्वाही :
उमेश नेमाडे यांच्या लेखी मागणीची दखल घेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा पुरवठा विभागाकडून पुरवठ्याचा ताजा अहवाल मागवण्यात यावा व आवश्यक तेवढा पुरेसा कोटा वाढवण्यासाठी उपायोजना करण्याच्या सूचना मंत्रालयातील त्यांच्या खाजगी सचिवांना ताबडतोब केल्या.दरम्यान, याबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडून जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला सुद्धा अवगत करण्यात आलेले आहे.

फोटो ओळ :

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना जिल्ह्यातील रेशनिंग मालाचा इष्टांक पुरेसा वाढवण्याची मागणी करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे समवेत जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे.