भुसावळ (प्रतिनिधी ) -: चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंती दिनानिमित्त मुंबईच्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात (एनजीएमए) ‘लेन्स अँड लेगसी: बॉलीवूड इन फोकस’ हे प्रदर्शन आयोजित केले आहे. त्याचे उद्घाटन ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता होईल. या प्रदर्शनात जळगाव जिल्ह्यातील कालखेडा येथील चित्रकार पिसुर्वो अर्थात जितेंद्र सुरळकर यांच्या चित्रकृतीची निवड झाली आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील अजरामर पोर्ट्रेट्स आणि सिनेप्रवासाचा गौरव करणारे हे एक छायाचित्र प्रदर्शन आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते उद्घाटन होईल. माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी प्रमुख पाहुण्या असतील. १९६० च्या दशकापासून ते डिजिटल युगापर्यंतची छायाचित्रे, सुपरस्टारकडून अभिनेता बनण्यापर्यंतचा बदल, ऐतिहासिक स्टुडिओचा अंत आणि चित्रपट पोस्टर्समधील सूक्ष्म कलाकुसर यांचे दस्तऐवजीकरण प्रदर्शनातून करण्यात येते. त्यात कलाकृती सादरीकरणाची संधी जळगाव जिल्ह्यातील चित्रकार जितेंद्र सुरळकर यांना मिळाली आहे.


