भुसावळ विभागात जागतिक वारसा दिन उत्साहात साजरा

भुसावळ (प्रतिनिधी)- जागतिक वारसा दिन निमित्त. दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी एक आठवड्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावर्षीची थीम “संघर्ष व आपत्तींच्या संदर्भात जिवंत वारशासाठी आपत्कालीन प्रतिसाद” अशी निश्चित करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी सेंट्रल रेल्वे स्कूल, भुसावळ येथे प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 78 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वी केला. विभागाच्या वारशाचे दर्शन घडविणाऱ्या भुसावळ येथील ऐतिहासिक विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय इमारतीला रंगीबेरंगी प्रकाशाने सजविण्यात आले.

दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी ओल्ड स्टीम लोको रोड येथून मूलभूत प्रशिक्षण केंद्रापर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत सेंट्रल रेल्वे स्कूल, भुसावळ येथील विद्यार्थी व बीटीसीचे प्रशिक्षणार्थी सहभागी झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांना बीटीसी मॉडेल कक्षातील विविध मॉडेल्सची माहिती देण्यात आली तसेच अपघात निवारण रेल्वे संदर्भात माहिती देण्यात आली.

वरील सर्व कार्यक्रम भुसावळ विभागाच्या यांत्रिक विभागामार्फत आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व सर्वसामान्य नागरिकांमध्ये सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्याच्या संरक्षणासाठी तयारी अधिक सक्षम करणे हा आहे.