भुसावळ विभागात ‘जागतिक वारसा सप्ताह’ निमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन :

भुसावळ (प्रतिनिधी) –
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामध्ये दिनांक १५ एप्रिल ते १८ एप्रिल २०२६ दरम्यान ‘जागतिक वारसा सप्ताह’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत आहे. यावर्षीचा विषय “आपत्ती व संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सजीव वारशासाठी आपत्कालीन प्रतिसाद” असा असून, या माध्यमातून वारसा स्थळांचे संवर्धन, संरक्षण आणि आपत्कालीन परिस्थितीत त्यांचे जतन करण्याबाबत जनजागृती करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.

या सप्ताहाच्या निमित्ताने भुसावळ विभागामार्फत दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी रेल्वे स्कूल, भुसावळ येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सुमारे १०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली कल्पकता आणि नाविन्यपूर्णता सादर केली.

विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वारसा संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

भुसावळ विभागाकडून अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून वारसा जतन आणि त्याबाबत जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे.