भुसावळमध्ये राजकीय खळबळ: नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांची रजनी सावकारें विरोधात गंभीर तक्रार

भुसावळ (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपरिषदेत मोठी राजकीय खळबळ उडाली असून नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांनी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांच्याविरोधात गंभीर आरोप करत पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, गायत्री भंगाळे यांच्या जात पडताळणी प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे सादर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही कागदपत्रे उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील फत्तेपूर बजेरिया येथून मिळवण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

सध्या भंगाळे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा दावा जळगाव येथील जात पडताळणी समितीकडे प्रलंबित आहे. दरम्यान, निवडणुकीत त्यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या रजनी सावकारे यांनी काही कागदपत्रे सादर करून त्यांच्या दाव्यावर आक्षेप घेतल्याचे समोर आले आहे. मात्र, समितीच्या प्राथमिक तपासणीत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांतील जमीन व मालमत्ता या भंगाळे किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या मालकीच्या नसल्याचा दावा नगराध्यक्षा भंगाळे यांनी केला आहे. त्यामुळे या कागदपत्रांच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तक्रारीत ‘कामता प्रसाद नारायण’ या नावाचा विशेष उल्लेख करण्यात आला असून, त्या व्यक्तीचा भंगाळे कुटुंबाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नावातील साधर्म्याचा गैरफायदा घेत चुकीची माहिती सादर करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणात जाणीवपूर्वक फसवणूक आणि कटकारस्थान रचल्याचा आरोप करत संबंधितांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 420 आणि 120 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सखोल चौकशी करून संबंधितांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाकडून प्राथमिक चौकशी सुरू होण्याची शक्यता असून, संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.