भुसावळात भगवान श्री परशुराम जन्मोत्सव उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन: यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण कॅप्टन आशिष दामले यांची उपस्थितीत भव्य शोभायात्रा ; :

भुसावळ (प्रतिनिधी) – ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त भुसावळ शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शोभायात्रेत डीजेचा वापर न करता पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात, महिलांचे लेझीम पथक, मुलींचे तलवार व फरसा पथक, ध्वज पथक, तसेच भगवान परशुरामांची प्रतिमा आणि पालखी यांचा समावेश असलेली भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे.

दि. १९ एप्रिल २०२६ रोजी दरवर्षीप्रमाणे भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळा समितीची निवड करण्यात आली असून, या सोहळ्यात समस्त ब्राह्मण समाज एकजुटीने सहभागी होत आपल्या परीने योगदान देत आहे. यंदाच्या उत्सवात विशेष आकर्षण म्हणजे परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले (मंत्री दर्जा) यांची उपस्थिती लाभणार आहे.

या निमित्ताने तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भगवान परशुरामांच्या चरणी ‘तीन पुष्प’ अर्पण करण्याची परंपरा यंदाही जपली जात आहे.

पहिले पुष्प : व्याख्यानमाला (दि. १७ एप्रिल २०२६)
संध्याकाळी ७.०० ते ८.०० या वेळेत ब्राह्मण संघ, न्यू एरिया वॉर्ड, भुसावळ येथे सौ. अनघ्या कुलकर्णी (भुसावळ) यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर ८.०० ते ९.०० या वेळेत ऋषिकेश (उत्तराखंड) येथील श्री राजेश बहुगुणा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

दुसरे पुष्प : मोटारसायकल रॅली (दि. १८ एप्रिल २०२६)
संध्याकाळी ५.३० वाजता श्री साई बाबा मंदिर, जामनेर रोड येथून भव्य दिव्य मोटारसायकल रॅलीची सुरुवात होऊन तापी नदी किनारी असलेल्या श्री भगवान परशुराम मंदिर येथे समारोप होईल.

तिसरे पुष्प : शोभायात्रा व महाप्रसाद (दि. १९ एप्रिल २०२६)
संध्याकाळी ५.३० वाजता श्री अष्टभुजा माता मंदिर येथून भव्य शोभायात्रा निघून म्युनिसिपल पार्कमधील श्री राम मंदिर येथे समारोप होईल. याठिकाणी रात्री ८.०० वाजल्यापासून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सर्वानुमते कार्यकारिणीची निवड
या अनुषंगाने झालेल्या बैठकीत सर्वानुमते कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी वेदप्रकाश ओझा, उपाध्यक्षपदी रोहित कुलकर्णी व आदित्य शर्मा, सचिवपदी घनश्याम मिश्रा, तर कोषाध्यक्षपदी देवेश कुलकर्णी व धनंजय कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.

या प्रसंगी माजी अध्यक्ष भूषण जोशी, कैलाश उपाध्याय, जयप्रकाश शुक्ला, उमाकांत शर्मा (नमा), अनिरुद्ध कुलकर्णी, भूषण वैद्य, प्रवीण मिश्रा, आशिष तिवारी, आनंद जोशी, ज्येष्ठ ए. के. तिवारी, गौरव हिंगवे, उमेश जोशी, किशोर जोशी, डॉ. सुधीर ओझा आदी मान्यवरांसह ब्राह्मण समाजातील अनेक सदस्य उपस्थित होते.