पोलिसांनाही हेल्मेट सक्ती ; नियमभंग केल्यास पोलिसांच्या सर्व्हिस बुकात नोंद

मुंबई – राज्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस विभागाने महत्त्वपूर्ण आणि कडक निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले असून, नियमाचे उल्लंघन केल्यास थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. एवढेच नव्हे, तर संबंधित उल्लंघनाची नोंद त्यांच्या सर्व्हिस बुकात करण्यात येणार आहे.

अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रविण साळुंके यांनी यासंदर्भात सर्व युनिट्सना स्पष्ट आदेश जारी केले आहेत.

अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक

मागील काही वर्षांत दुचाकी अपघातांमध्ये मृत्यू आणि गंभीर जखमींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विशेषतः डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण समोर आले आहे. त्यामुळे हेल्मेट वापरणे हा केवळ नियम नसून जीवनरक्षक उपाय असल्याचे प्रशासनाने अधोरेखित केले आहे.

मुंबई-नागपूर पुढे, इतर ठिकाणी मागे

आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार मुंबई आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये हेल्मेट वापराचे प्रमाण तुलनेने समाधानकारक आहे. मात्र इतर जिल्हे आणि ग्रामीण भागात हे प्रमाण अत्यंत कमी असून काही ठिकाणी ते 20 टक्क्यांपेक्षाही खाली असल्याचे दिसून आले आहे.
पोलिसांनीच घालावा आदर्श

नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी पोलिसांनी स्वतः आदर्श घालून देणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याने हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे

उल्लंघन केल्यास कडक कारवाई

हेल्मेट न वापरणाऱ्या पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई

सोशल मीडियावर फोटो/व्हिडिओ आढळल्यास तत्काळ कारवाई

दंड न भरल्यास त्याची नोंद सर्व्हिस बुकमध्ये

राज्यभर अंमलबजावणी

हा आदेश मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह सर्व पोलीस आयुक्तालये आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांना पाठवण्यात आला आहे. ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांनाही याची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

‘पोलीस’ नेमप्लेटवर न्यायालयाची स्पष्टता

खाजगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी नेमप्लेट लावण्याबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावर न्यायालयाने महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हटले न्यायालयाने?

काही विशिष्ट आणि अधिकृत तपास कार्यासाठी पोलिस अधिकारी खाजगी वाहनांवर ‘Police’ किंवा ‘पोलीस’ नेमप्लेट वापरू शकतात

मात्र ही मुभा मर्यादित आणि अटींवर आधारित आहे

केवळ अधिकृत कामासाठीच वापर

वाहतूक नियम मोडणे किंवा विशेष सवलती घेण्यासाठी वापर निषिद्ध

सामान्य नागरिकांनी अशी नेमप्लेट लावल्यास ती बेकायदेशीर

या निर्णयामुळे पोलिसांची जबाबदारी अधिक झाली असून, नागरिकांमध्येही हेल्मेट वापराविषयी जागरूकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रस्ते सुरक्षेसाठी नियम सर्वांसाठी समान असल्याचा स्पष्ट संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.