भुसावळ (प्रतिनिधी) – मध्य रेल्वे भुसावल विभागातील खंडवा स्थानकावर एका मालगाडीच्या आगमनानंतर ड्युटीवर तैनात ट्रेन मॅनेजर यांनी आपल्या सतर्कता व जागरूकतेचे उत्कृष्ट उदाहरण दाखवले दिनांक 12.04.2026 रोजी एलपीजी भरलेल्या एका वैगनमधील गळती त्वरित ओळखली. त्यांनी कोणताही विलंब न करता संबंधित सर्व विभागांना माहिती दिली, ज्यामुळे संभाव्य अपघात वेळेत टाळता आला.

माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने कारवाई करत कोचिंग व वैगन विभाग, आरपीएफ कर्मचारी तसेच भारत पेट्रोलियम यांना कळविण्यात आले. कोचिंग व वैगन पथकाने घटनास्थळी पोहोचून तपासणी केली व संबंधित वैगनला “सिक” घोषित केले.
सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत गाडी नियंत्रित (डेड) करण्यात आली तसेच संयुक्त पथकाने गळती होत असलेल्या वैगनवर ओले कंबल व ज्यूटच्या पोत्यांचा वापर करून गॅसचा प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न केले.
गळती असलेला वैगन अत्यंत काळजीपूर्वक उर्वरित रेकपासून वेगळा करून सुरक्षित उभा करण्यात आला, तर उर्वरित रेक पूर्ण सुरक्षिततेसह गंतव्यस्थानाकडे रवाना करण्यात आला. सुरक्षेच्या दृष्टीने तीनही लाईन वरील ओएचई वीजपुरवठा तात्काळ बंद करण्यात आला, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या ठिणगीमुळे अपघात होण्याची शक्यता टाळण्यात आली.
भारत पेट्रोलियम (BPCL) ची मेंटेनन्स टीम प्रीतमपूरहून घटनास्थळी पोहोचली व गळती यशस्वीरित्या नियंत्रित करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने प्रभावित परिसर तात्काळ सुरक्षा परिसर घेऊन सील केला, ज्यामुळे प्रवासी व रेल्वे कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात आली.
सुरक्षेच्या दृष्टीने काही काळासाठी रेल्वे गाड्यांचे संचालन फक्त प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरून करण्यात आले. कार्य पूर्ण झाल्यानंतर सर्व प्लॅटफॉर्म (1 ते 6) वर सामान्य वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. प्रवाशांना सतत उद्घोषणांद्वारे आवश्यक माहिती देण्यात आली तसेच मदत केंद्रे कार्यरत ठेवण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना मार्गदर्शन व सहाय्य पुरवून कोणतीही गैरसोय होऊ दिली नाही. या कार्यात जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच स्थानिक प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा आपली तत्परता, उत्कृष्ट समन्वय व सुरक्षेप्रती असलेली बांधिलकी दाखवत संभाव्य धोका पूर्णपणे टाळला. या घटनेत ट्रेन मॅनेजर श्री हिमांशु अग्रवाल यांनी ड्युटीदरम्यान दाखविलेली सतर्कता अत्यंत प्रशंसनीय असून त्यांच्या कार्यामुळे मोठा अपघात टळला.


