बहिणाबाई विक्री केंद्र’ या नावावरून नव्या वादाला तोंड फुटले : नामकरणात दुरुस्तीची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी ) -शासनाच्या निधीतून जुन्या प्रांत कार्यालयाच्या जागेत महिला बचत गटातील भगिनींना प्रोत्साहन देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागांतर्गत उभारलेल्या ‘बहिणाबाई विक्री केंद्र’ या नावावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. या नावामुळे नेमका संदर्भ स्पष्ट होत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने नावात तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी साहित्यीक प्रा. जतीन मेढे यांनी केली आहे.

ग्रामीण व शहरी भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, बचत गट चळवळीला गती मिळावी असा या प्रकल्पाचा उद्देश आहे. मात्र, केंद्राला ‘बहिणाबाई विक्री केंद्र’ असे सर्वांना संभ्रमात टाकणारे नाव दिले आहे.बहिणाबाई म्हणजे नेमके कवयित्री बहिणाबाई चौधरी की वारकरी संप्रदायातील संत बहिणाबाई असा नावाचा अर्थबोध स्पष्ट होत नाही. मराठी ही राज्याची मातृभाषा असून तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तरीही प्रशासनाकडून अशा प्रकारचे संदिग्ध नामकरण होणे योग्य नसल्याची खंत प्रा. मेढे यांनी व्यक्त केली. त्यात सुधारणा करण्याची मागणी केली.