पुण्यात पोलिसांकडून ब्लॅकमेलिंगचा धक्कादायक प्रकार; उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा

पुणे : शहरातील पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का देणारी गंभीर घटना उघडकीस आली आहे. एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या महिला प्राचार्याला ब्लॅकमेल करून तब्बल सात लाख रुपये उकळल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून ‘खाकी वर्दी’वर डाग लागल्याची चर्चा सुरू आहे.

या प्रकरणात अजित बडे, सोनाली हिंगे आणि सुदाम तायडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी अजित बडे हे सध्या सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असून, सोनाली हिंगे या दामिनी मार्शल पथकात कार्यरत आहेत. त्या सोशल मीडियावर ‘रील स्टार’ म्हणूनही प्रसिद्ध आहेत. सुदाम तायडे यांची नेमणूक शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तिघांनी संगनमत करून महिला प्राचार्याला जाळ्यात ओढले. तुमच्यावर ‘पॉक्सो’ (बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि अटक होऊ शकते, अशी भीती दाखवून त्यांनी प्रचंड मानसिक दबाव निर्माण केला. प्रकरण मिटवण्यासाठी सात लाख रुपयांची मागणी करण्यात आली. अटकेची आणि बदनामीची भीती वाटल्याने पीडित प्राचार्यांनी संबंधित रक्कम दिली.

मात्र, नंतर हा प्रकार संशयास्पद वाटू लागल्याने प्राचार्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. ही तक्रार पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पोहोचताच त्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक तपासात पोलिसांचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी कठोर भूमिका घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.

या प्रकरणात विशेषतः सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग समोर आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुढील तपास सुरू असून, या घटनेमुळे पोलिस दलाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.