अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त १९ गावांची केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केली पाहणी

रावेर (प्रतिनिधी) — जळगाव जिल्ह्यासह रावेर लोकसभा क्षेत्रात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीटीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रावेर तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली.

या दौऱ्यात त्यांनी केऱ्हाळे बु., अहिरवाडी, पाडले खु., पाडले बु., निरूळ, खानापूर, चोरवड, अजनाड, अटवाडे, दोधे, नेहेते, खिरवड, मोरगाव, वाघोड, कर्जोद, भोकरी, तामसवाडी, पातोंडी आणि निंभोरे सिम या एकूण १९ गावांना भेट देत शेतीच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांच्या हानीबाबत माहिती जाणून घेतली तसेच शासन आणि विमा कंपन्यांकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यांची स्थिती तपासली.

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन रक्षाताई खडसे यांनी दिले. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

दौऱ्यादरम्यान त्यांनी काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली तसेच गावांमध्ये दुःखद निधन झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

या वेळी स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.