अकोला शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गॅस बुकिंगसाठी रांगेत उभ्या असताना एका माजी सरपंचाचा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

ही घटना गौरक्षण रोडवरील यदुराज एचपी गॅस एजन्सीसमोर घडली. मृत व्यक्तीचे नाव शंकर फपूर्डाजी शिरसाट (रा. अन्वी मिर्जापूर) असे असून ते गावाचे माजी सरपंच होते. गॅस केवायसी आणि बुकिंगसाठी ते दुपारी एजन्सीवर आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास ते लांब रांगेत उभे होते. मार्च महिन्यातील प्रखर उन्हात ३ ते ४ तास उभे राहिल्यामुळे त्यांना अचानक चक्कर आली. काही क्षणातच ते जमिनीवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी पिण्याच्या पाण्याची किंवा सावलीची कोणतीही व्यवस्था नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली असून, गॅस एजन्सीच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शंकरराव शिरसाट हे सामाजिक कार्यात सक्रिय होते आणि त्यांनी गावाचे सरपंच म्हणून काम केले होते. त्यांच्या अचानक निधनामुळे अन्वी मिर्जापूर गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. गॅस एजन्सीच्या नियोजनातील त्रुटींमुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत असून, संबंधित एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सध्या गॅस सेवांसाठी वाढलेली गर्दी आणि अपुरी सुविधा यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर प्रशासन आणि गॅस कंपन्या काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


