दाम्पत्याची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या ; चाळीसगाव तालुक्यातील घटना:

जळगाव – चाळीसगाव तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून, एका दाम्पत्याने एकाच झाडाला एकाच दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

सदर घटना ही शिवापूर शिवारात घडली. भगवान पोपट जाधव (वय ३८) आणि आशाबाई भगवान जाधव (वय २७) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही आपल्या शेतात राहत होते आणि शेतीसोबत मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास या दाम्पत्याने शेतातील उंबराच्या झाडाला एकाच दोरीने गळफास घेत जीवन संपवलं. सकाळी नातेवाईक शेतात गेले असता ही धक्कादायक बाब उघडकीस आली.

घटनेनंतर तातडीने दोघांना खाली उतरवून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन लहान मुले असून, शिक्षणासाठी ती सध्या बाहेरगावी राहत होती. आई-वडिलांच्या या टोकाच्या निर्णयामुळे ही दोन्ही मुले पोरकी झाली असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.