बोदवड (वा) येथील जामनेर रोड परिसरात असलेल्या अरिहंत जिनिंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत जिनिंगमधील मोठ्या प्रमाणावर साठवलेला कापूस जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील कापूस साठवलेला असल्याने आग काही क्षणांतच वेगाने पसरली आणि तिने भीषण रूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग आणखी पसरून मोठा अनर्थ टळला.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कापूस आणि काही यंत्रसामग्री जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून अधिक तपास सुरू असून, औद्योगिक ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.


