भालोद (वा ) – भालोद ता. यावल, येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी हितासाठी परदेशात वास्तव्यास असलेल्या श्री. गोपाळ आनंदा कोळी (ह. म. न्यूझीलंड) यांनी दिलेल्या भरीव आर्थिक योगदानामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत परदेशात यश मिळवलेल्या श्री. कोळी यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांच्या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचे कष्ट आणि त्याग तसेच दिवंगत बंधू मधुकर दादा कोळी यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या स्मरणार्थ व कृतज्ञतेपोटी त्यांनी आपल्या जन्मभूमीतील शाळेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
यापूर्वी त्यांनी शाळेच्या नूतनीकरणासाठी रु. १,०१,०००/- इतकी देणगी दिली होती. त्यानंतर माजी मुख्याध्यापक डी. व्ही. चौधरी सर यांच्या आवाहनास प्रतिसाद देत त्यांनी पुन्हा रु. १,५०,०००/- देणगी जाहीर केली. अशाप्रकारे एकूण रु. २,५१,०००/- इतके उदार योगदान देऊन त्यांनी शाळेतील एका वर्गखोलीचे दातृत्व स्वीकारले आहे.
श्री. कोळी यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांनी सुमित कोळी, नितीन कोळी, आशा कोळी, लता कोळी, प्रियांका कोळी, अजय कोळी आणि अमित कोळी धनादेश संस्थेच्या संचालक मंडळाकडे सुपूर्द केला.
या योगदानातून त्यांनी आपल्या आई-वडील आणि बंधूंबद्दलचा आदर, सन्मान आणि प्रेम कृतीतून व्यक्त केले आहे. त्यांच्या या दातृत्वाबद्दल संचालक मंडळाने कृतज्ञता व्यक्त केली असून, विद्यार्थ्यांच्या हितासाठी दिलेली ही मदत संस्थेच्या सदैव स्मरणात राहील, असे सांगितले.
— संचालक मंडळ, से ए सोसायटी, भालोद


