नाटकात नवनवीन प्रयोगांची गरज – रमाकांत भालेराव :

भुसावळ (प्रतिनिधी) – जागतिक रंगभूमी दिनानिमित्त स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे सायंकाळी उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी रमाकांत भालेराव यांच्या हस्ते नटराज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नटराज पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व रंगकर्मींच्या हस्तेही पूजन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना रमाकांत भालेराव यांनी नाटकात नवनवीन प्रयोग होणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले. बदलत्या काळानुसार रंगभूमीनेही नव्या कल्पना, तंत्र आणि मांडणी स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास नारायण माळी, धनराज कुंवर, विरेंद्र पाटील, कुणाल बाविस्कर, हर्ष बाविस्कर, अवधूत दामोदरे, ज्योती शितोळे, मंगेश भावे, विराज गोरे, समीर पाटील यांसह अनेक रंगकर्मी व रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण माळी यांनी केले. एकूणच हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.