सावदा (प्रतिनिधी) – सावदा शहरातील सहकारी दूध उत्पादक संस्थेमध्ये विदेशी मद्य साठवून विक्री होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी सावदा पोलिसांनी छापा टाकत कारवाई करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दि. २५ मार्च २०२६ रोजी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, शहरातील सहकारी दूध उत्पादक संस्थेमध्ये एका व्यक्तीने विक्रीसाठी विदेशी मद्य आणून ती डेअरीच्या मागील खोलीत ठेवली आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला.
छापा कारवाई दरम्यान डेअरीतील किचन रूममध्ये एका बॉक्समध्ये ७५० एमएलच्या ९ सिलबंद विदेशी मद्याच्या बाटल्या, अंदाजे १३,५०० रुपये किमतीच्या, आढळून आल्या. चौकशीत या बाटल्या संस्थेतील क्लर्क नितीन रामकृष्ण बेंडाळे (वय ४६, रा. सावदा, ता. रावेर) यांनी विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७६/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश पाटील हे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
दरम्यान, या अवैध दारू विक्रीमध्ये संस्थेच्या संचालक मंडळाचा काही सहभाग आहे का, याचाही पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, पोहेकॉ उमेश पाटील, पोना जाकीर मन्सुरी व पोकॉ मयुर पाटील यांनी संयुक्तपणे केली.



